कंपोस्टिंग विज्ञान

 कंपोस्टिंग करण्यामागचं सायन्स:


मी जेंव्हा कंपोस्टिंग सुरु केलं, तेव्हा काहीच माहीती नव्हती, किड्यांची वासाची किळस येत होती. मनापासुन होत नव्हतं कंपोस्टिंग....आणि ह्याच कारण होतं अज्ञान... मग त्यामागच विज्ञान काय आहे हे विज्ञान आश्रम आणि प्रिया भिडे ह्यांच्या कडुन शिकुन घेतलं. जे शिकले, अनुभवलं ते हे आहे :


सगळ्यात पहिला प्रश्न पडला, जो सगळ्यांना पडतो कि कश्या कश्याच कंपोस्टिंग मी माझ्या घरी (म्हणजे अगदी १bhk/2 bhk  मध्ये सुद्धा) वास न येता करु शकते?


:उष्ट- खरकटं .. जे कुजत वेज नॉनवेज अश्या सर्व नैसर्गीक पदार्थांचे विघटन होऊन माती होते.. 

खरं तर हे समर्थांंनी छान मांडलं आहे :

https://sites.google.com/site/samarthsahitya/home/dasbodh/d15/s4



ओल्या कचर्‍याची (खरं तर इथुन पुढे आपण ह्याला ओला खाऊ म्हणुया) विघटन क्रिया दोन प्रकारांनी होऊ शकते. हवेच्या संपर्कात (Aerobic Composting)  किंवा  हवाबंद जागेत (anaerobic composting). 

हवाबंद जागेत (anaerobic composting).  करण्यासाठी वेगळा सेट अप म्हणजे बायोगॅस प्लांट लागतो.  ह्यात भांडवल आहे, पण हवाबंद जागेत विघटन क्रिया घडत असताना मिथेन गॅसची निर्मीती होते. जी तांत्रिक पद्ध्तीने साठवुन उर्जेच्या रुपात आपल्याला वापरायला मिळु शकते.

बायोगॅसचा हा खर्चीक प्रपंच मांडायचा नसेल तर आपले आजोबा-पंजोबा पुर्वापार करत होते तोच उकिर्डा, आपल्या घरी म्हणजे १bhk/2 bhk मध्येही मांडु शकतो.   उकिर्ड्याचे अनेक शोभिवंत असेही प्रकार आपण बघणार आहोत, त्यातले तुमच्या घराला आणि खिशाला शोभेल ते प्रकार तुम्हीच निवडा.

ओल्या खाऊचे विघटन होण्यासाठी तुम्हाला फक्त सोय करुन द्यावी लागेल ती:

१. ओला (नायट्रोजन) आणि सुका (कार्बन) ह्यांचे योग्य थर व प्रमाण, 

२. खेळती हवा आणि 

३.आद्र्तेची.....

बाकी विघटनाचा भार आपण निसर्गावर सोडुन देवु.


आधी ओला ( N-नायट्रोजन)  म्हणजे काय ते जाणुन घेवु :  

शिजवलेले न शिजवलेले , वेज व नॉनवेजचे सर्व टाकाऊ पदार्थ, हिरवी पाने, निर्माल्य, झाडांची कटिंगस ,

 (नोंद- ह्यात  डेअरी प्रॉडक्ट शक्यतो टाकु नयेत. व घरातील अन्न शिळे पडुन वाया जाणार नाही ह्याची खबरदारी घ्य्रावी म्हणजे आपला कंपोस्ट आटोपशीर रहातो.)


सुका (C-कार्बन) : 

सुकलेली पानगळ, लाकडाचा भुसा, कोको पीट (नारळाच्या शेंड्याचा चुरा- ह्याच्या पासुन बनवलेल्या विटा कुठल्याही नर्सरीत मिळतात.), अंड्याची कवचे, हाडं, वापरलेल्या चहाची बुक्की, माती किंवा तुमच्याच जुन्या कंपोस्ट्ची  माती, नवीन सुरु करत असाल तर दुसर्‍यानी केलेलं कंपोस्ट खत पण तुम्हाला कार्बन म्हणुन वापरता येऊ शकतं). 


ओल्या-सुक्याचे प्रमाण  (C:N Ratio) / थर कसे असावे:

बर्‍याच शात्रज्ञांनी C:N चे प्रमाण २५/३० : १ असे सांगितले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ओल्या-सुक्याचे प्रमाण  ओल्या भेळीप्रमाणे असावे.

आणि ओल्या-सुक्याचे सॅडविच प्रमाणे थरावर थर करायचे आहेत.


कृती:

१. कंपोस्ट बिन ला सर्व बाजुंनी भरपुर भोकं असावी, ज्यामुळे कंपोस्ट मध्ये हवा खेळती रहाते, 

मी कंपोस्टिंग साठी 2 आंब्याच्या लाकडी पेट्यांचा आणि 1 कार्टनच्या खोक्यांचा वापर करते.  माझी कार्टन ची खोकी ४ वर्षे होउनही अजुनही वापरात आहेत.

अ‍ॅमेझॉन किंवा कुठल्याही घरी उपलब्ध असलेल्या खोक्यांना कोणत्याही टोकदार वस्तुने सहज हवी तेवढी छिद्रे पाडता येतात. आंब्याच्या पेट्या वापरणार असाल तर त्यामधील गवत काढु नका. पेटीच्या भिंतींप्रमाने त्याचा वापर होतो, व पेटीत हवा खेळती रहाते.





भाजीवाल्यांचे तुटलेले क्रेटही कंपोस्टींग साठी वापरता येतात,


प्लास्टीकचे बास्केट, बादल्या छिद्रे पाडुन वापरता येवु शकतात.


२. सछिद्र कंपोस्ट बिन मध्ये तळाला २ इंचाचा कार्बन चा थर करावा, ज्यामुळे अतीरिक्त पाणी शोषले जाते.

३. मग वर सांगितल्या प्रमाणे १ इंच ओल्या थरावर सुक्याचा थर चढवावा.


ओल्या खाऊचा थर


ओल्याच्या प्रमाणात सुक्याचा थर



 अती ओल असेल तर कंपोस्ट मध्ये कुजण्याच्या क्रिये ऎवजी सडण्याची क्रिया होईल, आणि कंपोस्टचा वास येईल. ओल कमी पड्ली तर विघटनच होणार नाही, कारण पाण्याअभवी जीवाणु जगुच शकणार नाहीत.
 
नवीन कंपोस्टिंग करणार्‍यांना सुक्ष्म जीवाणु कंपोस्ट मध्ये सोडण्यासाठी बाजारात मिळणारे वेगवेगळे culture  वापरावे लागतात. किंवा  जीवामृत, शेण गोमूत्र पाणी कंपोस्ट्ववर १५ दिवसांतुन एकदा शिंपडलं तरी पुरे होतं.

४. कंपोस्ट बिन झाकुन अंधार होईल अशी व्यवस्था करावी. कारण विघटन हे मुखत्वे अंधार आवडणार्‍या जीवाणु आणि जीवांकडुन होते, 

५. कंपोस्टिंग ची क्रिया घडत असताना तापमान ६० अंशापर्यंत वाढु शकते, साधारण १५ दिवसात कंपोस्ट तयार असते, तयार कंपोस्टचे तापमान नॉर्मल असते.


कंपोस्ट मध्ये खेळती हवा, पाणी (योग्य प्रमाणात ओल), अन्न (ओला/सुका खाऊ), आणि अंधार ह्या मुलभुत गरजा पुरवल्या तर हे जीव कचर्‍याचं सोनं करुन देतात.


तयार कंपोस्ट ठेवण्यासाठी सुद्धा खोकी, बादल्या ड्रुम जे उपलब्ध होईल त्याची सोय करावी. जे हवाबंद असतील तरी चालु शकेल, कारण आपण ह्यात तयार कोरडे कंपोस्ट ठेवणार आहोत. आणि पुढे ह्याचा कार्बन म्हणून वापर करणार आहोत

      तयार कंपोस्ट खत वापरायचे असेल तर कसे वापरावे: कुंड्यामध्ये वापरताना तयार कंपोस्ट मध्ये 10% माती व 5% नीम पेंड किंवा राख किटकनाशक म्हणुन घालून कुंड्यामध्ये वापरावे, झाडे छान वाढतात.


F.A.Q:

1. माझ्या कंपोस्ट मध्ये बुरशी होईल का?

नक्कीच होऊ शकते, पण घाबरू नका कारण जगात 90% बुरशी ही माणसांकरता मित्रा बुरशीच काम करते, खर तर बुरशी आहे म्हणून हे जग इतकं साफ आणि सुंदर आहे, बुरशीच्या अनेक जाती आहेत, ज्या कुजण्यास कठीण असलेले पदार्थही कुजवू शकतात जे काम जीवाणुंसाठी अशक्य आहे. 

2. माझ्या कंपोस्ट मध्ये किडे झालेत?

कंपोस्टिंग च्या प्रक्रियेमुळे बरेच कीटक, माश्या, मुंग्या आकर्षित होत असतात. पण त्यांचा आपल्याला काहीच त्रास होत नाही, कारण ते कंपोस्टच्या बाहेर येत नाहीत. खरं सांगायच तर तुमच्याच मदतीसाठी येतात ते, कचरा खाण्यासाठी जेवढं मोठं पोट तेवढं चांगलं आपल्यासाठी .....

 जीवाणुंपेक्षा किडे आणि मुंगीचं पोटं मोठं, black soldier fly  नावाच्या माश्या येतात कधीकधी.... त्यांच पोट ह्यांच्यापेक्षा मोठं, त्यांच्या पेक्षा गांडुळांच पोट मोठं....कोणाच्याही पोटातुन निघाली तरी मातीच होणार शेवटी.


3. माझ्या कंपोस्टला वास येत असल्यास काय करायचे?

अती पाण्यामुळे किंवा अपुऱ्या हवेमुळे कधीतरी अशी परिस्तिथी उद्भवू शकते. असे झाल्यास कंपोस्ट मध्ये सुका खाऊ म्हणजे कार्बेन, राख चे प्रमाण वाढवावे.


4. कंपोस्टिंग साठी माझा ओला खाऊ मी कापून , मिक्सर मध्ये काढून घेऊ का, विघटन लवकर होण्यासाठी??

आपला स्वतः चा ताप ह्या कामात अजिबातच वाढवायचा नाही, कारण एकदा का ही कामगिरी जीव/जीवणुवर टाकली की ते ती चोख पार पाडतात, आपला वेळ आपण वाया घालवला तर ही पद्धत अतिशय क्लिस्ट होऊ शकते, परिणामी त्यातला नियमितपणा ढळू शकतो.


Ref:

·         Inora- www.inoraindia.com Contact- Veena Godbole.- 9637575945.

o   इनोरा मध्ये वेगवेगळ्या जातीची गांडूळे, culture मिळते, जे सुरवात करणार्यांनी वापरण्यास हरकत नाही.

डेली डंप ने खूप सुंदर अशी मातीची उत्तरंड असलेली कंपोस्टची रचना केलेली आहे, जी दिसायला पण सुरेख दिसते. 

·         Sheti udyog Mandal, Swargate:  

o   स्वारगेट च्या शेती उद्दोग मध्ये कोको पीट, नीम पेंड, कंपोस्टिंग करता ग्रो बॅग्स, microbes culture असे बरेच काही मिळते

 Circuit: https://www.facebook.com/soilcircuit/ Contact-Priya Bhide

o   डेक्कन च्या त्याच्या घरी प्रिया भिडे कंपोस्टिंग चे workshopes देखील घेतात.

    माझा कचरा ही माझी जबाबदारी हे कळत होतं, पण कचर्‍याला हाताळण्याचं विज्ञान जाणुन घेतल्यावर माझ्या मनातील ओल्या कचर्‍याबद्दलची घृणा नाहिशी झाली.  कंपोस्टिंग करणं मुळीच अवघड नाही हे कळुन चुकलं, अगदी ओल्या कचर्‍याची बादली धुण्यापेक्षा कमी त्रासाचं वाटलं मला तर... 

      निर्माल्याचा एक वेगळा प्रश्न आहे बर्‍याच जणांपुढे, भक्तीभावाने पुजा केल्यावर त्यामागच्या धार्मिक भावनाही आहेत, शहरात राहणार्‍या माणसांनी हे निर्माल्य टाकायचं कुठे??? नदीत किंवा समुद्रात टाकुन पाणी दुषीत करण्यापेक्षा, तीथल्या कलशात टाकण्यापेक्षा,  कंपोस्टिंग हा पर्याय केंव्हाही चांगला, पंचमहाभुतांनी बनलेला निसर्गदेवच पावेल कदाचित ✋


            तुमचे  चांगले वाईट अनुभव आम्हाला सांगा. आवडले तर आम्ही पण करुन बघु किंवा गरज पडली तर तुम्हाला मदतही करु 😊

Comments

  1. खुप सोप्या पद्धतिने खुप महत्वाची माहिती सांगितली आहे. पुन्हा संदर्भ म्हणून दिलेली काही ठिकाणांची माहितीही उपयोगी पडेल. समर्थांच्या या विषयावरच्या ओव्यांचा संदर्भ तर खुपच आवडला. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. तज्ञांनी जे शिकवलं, ते उतरवलय ह्या पानात. सगळ्यांना हे विज्ञान कळावं म्हणुन. मी फ्क्त ह्या माहितीचा प्रसार करण्याचं काम केलयं!
      स्वतः च्या कचर्‍याची जबाबदारी ज्यांना जाणवलीय त्यांच्या साठी माहित असलेले संदर्भ जोडलेत, येन केन मार्गे प्रदुषण नाही माती व्हावी......

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्ठितीक विद्युत